घराणेशाहीला फाटा देत माजी मंत्री बसवराज पाटील यांचा मोठा निर्णय
जिल्हा परिषद निवडणुकीत सर्वसामान्य कार्यकर्त्यांना संधी,सर्वत्र कौतुक
धाराशिव रिपोर्टर
जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी मंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते बसवराज पाटील यांनी एक महत्त्वपूर्ण आणि राजकीय दृष्ट्या आदर्श ठरणारा निर्णय घेतला आहे.घराणेशाहीला स्पष्टपणे फाटा देत त्यांनी स्वतःच्या पुत्राला उमेदवारी न देता सर्वसामान्य,निष्ठावान कार्यकर्त्यांना संधी देण्याचा निर्णय घेतला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वारंवार केलेल्या आवाहनानुसार, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये घराणेशाहीपेक्षा कार्यक्षम आणि तळागाळातील कार्यकर्त्यांना प्राधान्य द्यावे, या भूमिकेला अनुसरून बसवराज पाटील यांनी हा निर्णय घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
विशेष म्हणजे, जिल्हा परिषद निवडणुकीत बसवराज पाटील यांचे पुत्र शरण पाटील यांना उमेदवारी न देता, पक्षासाठी वर्षानुवर्षे काम करणाऱ्या सामान्य कार्यकर्त्यांना पुढे आणण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. या निर्णयामुळे भाजपामध्ये सकारात्मक संदेश गेला असून, कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
राजकीय क्षेत्रात घराणेशाहीवर सातत्याने टीका होत असताना, बसवराज पाटील यांचा हा निर्णय भाजपाच्या अंतर्गत लोकशाहीला बळ देणारा मानला जात आहे. अनेक कार्यकर्त्यांनी याचे स्वागत करत, हा निर्णय इतर नेत्यांसाठीही आदर्श ठरेल, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
दरम्यान, जिल्हा परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत हा निर्णय भाजपासाठी राजकीयदृष्ट्या फायदेशीर ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सर्वसामान्य कार्यकर्त्यांना संधी मिळाल्याने संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत होईल, असा विश्वास पक्षातील वरिष्ठांनी व्यक्त केला आहे.
एकंदरीत, घराणेशाहीपेक्षा कार्यकर्त्यांच्या कर्तृत्वाला प्राधान्य देणारा बसवराज पाटील यांचा हा निर्णय सध्या राजकीय चर्चेचा केंद्रबिंदू ठरत असून, त्याबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.























